अवयवदान

ही दानापेक्षा अवयवदान हे पवित्र दान आहे. त्यासंदर्भातील कथित गैरसमज दूर करून प्रत्येकाने अवयवदानासाठी पुढाकार घ्यायला हवा. आपण गेल्यावर आपले देता येण्यासारखे अवयव दान देऊन आपण काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर त्यापेक्षा तर अधिक आनंदाचे असे काय असेल ?
विशेषतः मस्तिष्कमृत (ब्रेड डेड) झालेल्या रुग्णाचे अवयव वेळेत दान झाले तर कितीतरी आयुष्यांना नवे पंख लाभू शकतात.
मरावे परी कीर्तीरुपी उरावे’ अशी मराठीत म्हण आहे. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल. योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येक जण हे विविध अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची नेमकी कारणे कोणती?

जनजागृतीची गरज ज्या संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्व आहे, त्या भारतीय संस्कृतीला अंधश्रद्धा नामक अविचारी भावनेने ग्रासून टाकले आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान असले तरी लोकांना फारशी कल्पना नसल्याचे जाणवते. कदाचित याच कारणास्तव अवयवदानाला हवा तसा प्रतिसाद जनसामान्यांतून मिळत नाही.
एकीकडे अंधश्रद्धेमुळे अवयवदानाविषयी लोकांमध्ये संभ्रम असताना अनेक सुशिक्षित माणसांना मुळात अवयवदानाविषयीचे मार्ग माहीत नाहीत.

अवयव हे श्रेष्ठदान आहे, हा केवळ मौखिक प्रचाराचा भाग झाला. खरे तर या पलीकडे जात काहीतरी करण्याची इच्छा पाहिजे. खरे तर किडनी दानाला सामाजिक दान म्हणून पाहण्यापेक्षा पैसा कमावण्याचे साधन या दृष्टिकोनातून पाहिले जाते. किडनी या अवयवाला काळ्याबाजारात खूप महत्त्व आहे. किडनीचे झोल करून डॉक्टर व किडनी विकणारा बक्कळ पैसा कमावतो, हे आजचे चित्र आहे.
संयुक्त महाराष्ट्रात मोठे संत होऊन गेले. आध्यात्मिक भक्ती शिकवून गेले. देवाची ओळख करून दिली. पण कधीच नेत्रदान, अवयवदान करण्यास सांगितले नाही. कारण हे देह शरीर जसा जन्माला येतो तसेच मातीत मिसळतो. देशच घडावायचा असेल तर, लोकशाहीला जागी करा. अवयव प्रत्यारोपणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावा. तरच राष्ट्र पूर्तत: उभे राहील.
कारण अवयवदान करण्यात आपले आजपर्यंतचे धर्म विषयक संस्कार आड येतात. मृत शरीर अवयव काढून विद्रूप करायचे किंवा त्या मृतदेहावर योग्य ते संस्कार होतील की नाही/फ? आत्म्याला मुक्ती मिळेल का नाही असे अनेक कारणे, गैरसमज आहेत. आणि त्या गैर समजुती दूर करण्यासाठी प्रत्येकाने आपल्यापरीने या मोहिमेत आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे .

आपल्या देशातील जनतेला अंधश्रद्धेने एवढे ग्रासून ठेवले आहे, की त्याला डावलून आपली तर्कशुद्ध बुद्धी माणसे गहाण ठेवून बसतात.
अवयवदान हा खरे तर मानव नामक प्राण्याच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडलेला नवा आविष्कार आहे. या आविष्कारामुळे परावलंबी माणूस स्वावलंबी आयुष्य जगू शकतो. नेत्रदान हा प्रकार गेल्या तीन दशकांत खूप गाजला. पण किती अंध लोकांना दृष्टी परत मिळाली याची आकडेवारीच केव्हा वाचायला, बघायला, ऐकावयाला मिळाली नाही. याचे कारण केवळ अंधश्रद्धाच नाही. त्याला अनेक कारणे आहेत. दारिद्रय़ हे त्यापैकीच. इथे खाण्यापिण्याची उपासमार असताना शिक्षण मिळणे दुरापास्त. अवयवदान हा प्रकारच दुरूनदुरून माहीत नाही. ज्याला माहिती आहे त्याला अवयवदानाचा खर्च झेपेल असेही नाही. डॉक्टरांनी अवयवदानाची माहिती दिली तरीही ज्या कुणाचा अवयव लावला जाईल, ते गरजूचे शरीर स्वीकारेल का, याबाबत डॉक्टरच प्रश्नार्थी मुद्रेत रुग्णांसमोर उभे राहतात. अशा वेळी कसा होईल अवयवदानाचा प्रसार? तेव्हा आपल्या देशात तरी साध्य हे स्वप्नवतच वाटणार. या सर्व प्रकारात एक मोठी शिस्तबद्ध चळवळ सर्व थरात राबवावी लागेल. प्
अवयवदानासाठी ‘इच्छा’ महत्त्वाची
मरणोत्तर मावनी अवयवाची एक तर राख होते किंवा माती! मरणोत्तर नेत्रदान, त्वचादान, किंवा अवयवदान केल्यामुळे जर अन्य कोणा गरजूला जीवनाची अनुभूती घेता येऊ शकेल तर त्यापेक्षा कोणते श्रेष्ठ दान असूच शकत नाही. कुटुंबप्रमुखाच्या सुज्ञ व प्रभावी प्रबोधनातून अन्य सर्वच सदस्यांना अवयवदानासाठी निश्चितच प्रवृत्त करता येऊ शकते, हा माझा स्वानुभव आहे. समाजाची मानसिकता ही अशाच प्रबोधनातून निश्चितपणे बदलता येईल.
‘अवयवदानांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता’

अवयवदानाची माहिती घराघरात पोहोचवा!

अवयवदानाच्या माध्यमातून मृत्यूनंतरही जिवंत राहता येते. हे काम पुण्य कमावण्याचे आहे. सर्व इंद्रिये आपल्याला भगवंताने दिली आहेत. तुकोबांच्या भाषेत सांगायचे झाले तर दिली इंद्रिये हात पाय कान । डोळे मुख बोलाया वचना।। या शब्दांत तुकोबांनी शरीराची महती सांगितली आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण या इंद्रियांचा पुन्हा वापर करू शकतो हे शक्य झाले आहे. पण या अवयवदानाचीच माहिती योग्य प्रकारे लोकांना मिळत नाही. सोपी सुटसुटीत माहिती सर्व समाजापर्यंत पोहोचली पाहिजे.
जी माणसे या दानात सहभागी होतील त्यांच्यासाठी विशिष्ट निशाणी त्यांना दिली जावी. कारण गरजू माणसे यानिमित्ताने पटकन कळतील तसेच गरजूंना मदत करणारी इच्छुक माणसेही यानिमित्ताने पुढे येतील. या मोहिमेला घराघरापर्यंत नेले गेले पाहिजे. किंबहुना प्रत्येक घरात पत्रके पाठवून माहिती देऊन त्याची महती लोकांना पटवून दिली पाहिजे. तरच माणसे पुढे येतील.
अवयवदान हे महादान
अवयवदानाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आजच्या घडीलाही कित्येक रुग्णांना उपचाराअभावी किंवा आर्थिक पाठबळ नसल्याने मृत्यूच्या छायेत दिवस काढावे लागतात. अवयवदान करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. भारतात असलेल्या धार्मिक चालीरीती आणि त्याचा समाजावर असलेला प्रचंड पगडा यामुळे अवयवदान करण्याची मानसिकता दिसून येत नाही.
आपल्या मृत्यूनंतरही आपले हे शरीर आणि शरीराचे अवयव दुस-या व्यक्तीसाठी उपयोगी पडले तर त्यासारखे अन्य पुण्य नाही.
असाध्य आजाराने, अपघाताने किंवा अन्य कारणाने माणसाच्या शरीरात निकामी झालेले हृदय, मोठे अवयव किंवा त्वचा यांचे प्रत्यारोपण करून संबंधिताला नव्याने जीवन जगण्याची संधी देणा-या या तंत्राने मानवी जीवनात क्रांती घडवून आणली आहे. प्रत्यारोपण कार्यात देहदान, नेत्रदान, अवयवदान, त्वचादान याची नितांत गरज आहे. अवयवदानाबाबतचे गैरसमज, अंधश्रद्धा यात अडकलेल्या भारतीयांमध्ये अवयवदानाविषयी इच्छा आहे, पण त्याबाबत योग्य मार्गदर्शन देणारे कोणी नसल्याने हा विचार केवळ विचारापुरताच मर्यादित राहतो. परिणामी अवयवदान मोहिमेस लोकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतरही त्या व्यक्तीचा समाजाला उपयोग होऊ शकतो, ही धारणा समाजमानसात रुजायला हवी.

जनजागृतीची गरज
अवयवदान हे श्रेष्ठदान असले, तरी अवयवदान करण्याविषयी लोकांपर्यंत परिपूर्ण माहिती उपलब्ध झालेली नाही. अवयवदान केल्याने दुस-या व्यक्तीला जीवनदान मिळते. मात्र अवयवदान कसे व कुठे करावे, याबाबत लोकांमध्ये जनजागृती नाही. अवयवदान करावे, असा सरकारचा कायदा आहे. मात्र कायदा करून उपयोग नाही, तर अंमलबजावणीसाठी यंत्रणा हवी. सरकारने अवयवदान जनजागृतीसाठी ठिकठिकाणी माहिती केंद्रे, हेल्प लाइन सुरू करावी. अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेणा-यांचा सरकारने जाहीर सत्कार करावा. जेणेकरून अवयवदानासाठी लोक स्वत:हून पुढे येतील. सिने कलाकार अवयवदान करण्याच्या गप्पा मारतात. परंतु प्रत्यक्षात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अवयवदान हे श्रेष्ठदाव असून त्याचा दुस-या व्यक्तीला उपयोग होईल, याचा विचार करावा, अशी मते वाचकांनी व्यक्त केली आहेत.
अवयवदानामुळे अन्य कोणी तरी हे जग पाहू शकेल, या आपल्या अवयवामुळे कोण वाचू शकत असेल तर त्यासारखे पुण्य नाही, परंतु त्यासाठी सर्वाची मनाची तयारी हवी, खरं म्हणजे आपण दुस-यांना बोलण्यापेक्षा प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्य व माणुसकीचं दर्शन घडवायला हवं यासाठी प्रबोधनाची नितांत गरज आहे. विशेषत: ग्रामीण भागात याचा जास्त प्रसार व्हायला हवा! समज-गैरसमज समाजात सर्वच बाबतीत आहेत. सामाजिक संस्था किंवा आरोग्य विभागाने पुढाकार घेतलेला कमी नसून लोकांची मानसिकता तयार करण्यावर भर हवा! यासाठी श्रीलंकेसारखा कायदा झाला तर उत्तमच आहे, पण त्याची अंमलबजावणी योग्य व्हायला हवी, तसेच रुग्णालयात अवयवदानाच्या बाबतीत जाणकार मदतनीस व मदतकक्ष व हेल्पलाइनही हवी! कारण जग किती पुढे गेलं तरी माणसं मनानं व वागण्याने अजून मागेच आहेत
मरावे परी देहरूपी उरावे
आपल्या देशात दरवर्षी दहा लाख लोक अवयव निकामी झाल्याने आजारी पडतात वा मृत्यूला सामोरे जातात. लोकांमध्ये अवयवदानाबाबत जागरूकतेचा अभाव, सरकारी कायद्याची आडकाठी अशा अनेक कारणांनी अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. व्यक्तींच्या अवयवांना पर्याय म्हणून दुस-या व्यक्तीच्या शरीरातील अवयव काढून त्यांचे प्रत्यारोपणही करता येणे आज शक्य झाले आहे. त्यातूनच देहदान, नेत्रदानसारख्या संकल्पना आज रुजत आहेत. ‘मरावे परी देहरूपी उरावे’ हा नवा मंत्र सध्या सांगितला जात आहे, परंतु भारतात दुर्दैवाने अवयवदात्यांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. –

‘जन्मताच अंध-अपंग जन्माला येणा-यांना नंतर यातना सोसाव्या लागतात. आपल्याला दृष्टी नाही. आपली शरीरयष्टी इतरांसारखी नाही. आपण अधू आहोत. याची खंत मनात बोचत असते. याच्या उलट जे डोळस आहेत, याची शरीरयष्टी दणकट आहे ‘ते’ मात्र अंध-अपंगांपेक्षा विचित्र वागतात. ज्यांच्यात व्यंग आहे अशा लोकांना अवयवदान करून वाचवणे हे मानव धर्माचे ‘श्रेष्ठदान’ समजण्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यावा. लोकांना प्रोत्साहित करावे. आज नव-नवे आजार डोके वर काढीत आहेत. आज जसे ‘रक्तदान’ शिबिरांचे कार्यक्रम सामाजिक संस्था आयोजित करतात, तसे कार्यक्रम अवयवदानाचे व्हायला हवेत. आयुष्यात चांगले जीवन जगता येईल. अवयदानाची मोहीम समाजातील तळागाळापर्यंत पोहोचायला हवी.

अवयव प्रत्यारोपण तंत्रात रुग्णांची प्रतीक्षायादी, दात्यांची नोंदी, दाता आणि गरजू रुग्ण यांचा यथायोग्य मेळ साधला जातो. अतिशय मेहनतीने पार पडणा-या या सामाजिक कार्याची दखल अजूनही म्हणावी तशी भारतात रुजली नाही. अवयवदान चळवळीविषयी भारतात सामाजिक जागृती करणे अतिशय कठीण होत असल्याने हजारो रुग्णांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. मृत्यूनंतर मानवी शरीरातील उपयुक्त आणि सक्षम अवयवदान करण्याचे आवाहन अशा सामाजिक संस्थेतर्फे वारंवार केले जाते. विज्ञान आता अत्यंत प्रगत झाल्याने प्रत्यारोपण ही प्रक्रिया जगभरात अवलंबिली जात आहे. या प्रक्रियेने गरजू रुग्णाला अवयव बदल करून आणखी काही वर्षे आयुष्य जगण्याची संधी मिळू शकते. परंतु पारंपरिक प्रथेमुळे भारतात ही कल्पनासुद्धा अस्वीकार असल्याने मरणोत्तर अवयवदानाचे प्रमाण नगण्य आहे. नवीन कायद्यामध्ये आता आपल्या प्रियजनांव्यतिरिक्त लांबच्या नातेवाइकांनासुद्धा अवयवदान करण्याची तरतूद करण्यात आली असून अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. भारत हा पारंपरिक रूढीवादी देश असल्यामुळे अवयव ही राष्ट्रीय संपत्ती गृहीत धरून तसा कायदा करणे योग्य होणार नाही. परंतु मानवी अवयवांची आवश्यकता याविषयी तळागाळापर्यंत जनजागृती करण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. –

भारत देश हा भाविकांचा, मूर्तिपूजकांचा, श्रद्धाळूंचा असून जणू दयासागरच आहे. भारतरूपी दुधाच्या पेल्यात साखर होऊन मिसळणारे अनेक भाग्यवंत पाहायला मिळतात. त्यांचे हृदयस्पंदन नेहमी देशबांधवांच्या भल्यासाठी होत असते. सुसह्य जीवन जगणा-या अनेक देशबांधवांमध्ये काही अभागी अपंग यातनामय जीवन जगताना दिसतात. काहींना जन्मताच तर काहींना अपघात होऊन अपंगत्व येते. अवयव गमावलेले कुणाच्या तरी आधाराची वाट बघत असतात. सुसह्य जीवनासाठी त्यांना अवयवांची गरज असते. मरणोत्तर अवयवदान करणारे अनेक दयाळू दुरितांचे जीवन उजळू इच्छितात, परंतु अवयवदान कसे व कुठे करावे हे त्यांना माहीत नसते. डोळे, मूत्रपिंड, मिळणे कठीण असून हे दान करणा-या दयाघनांची माहिती व नोंद असणे गरजेचे आहे. अवयवदानाचे महत्त्व व कर्तव्य, जनतेपर्यंत पोहोचवणारी सक्षम प्रचार यंत्रणा हवी.

अअवयवदान करा दुस-याला जगवा
कुणाचाही मृत्यू अकाली होणे अतिशय दुर्दैवी असते. सर्वस्वच संपते दु:खावेगात काही समजत वा सूचत नसते, अशा वेळी संयम, विवेक आणि मानवतावादी भूमिकेचे मयताच्या नातेवाइकांकडून जे दर्शन घडते, त्याला तोड नाही. अवयवदानाचे महत्त्व सर्वानाच आहे. परंतु समाजात स्वयंत्स्फूर्तीने एखादे उदाहरण घडले तर त्याची प्रेरणा इतरांनाही मिळते.

एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर अवयवदान करायची इच्छा असल्यास त्याने डोनर कार्डवर सही करून इच्छा नोंदवू शकतो. हे कार्ड दात्याने सतत आपल्याजवळ बाळगावे. जरी डोनरकार्डवर सही असली तरी मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाइकांच्या संमतीशिवाय अवयवदान होऊ शकत नाही.