काळजी घ्या… काळजाची…
डॉ. बिपिन विभूते,
लिव्हर ट्रान्सप्लान्ट सर्जन, पुणे.
आईच्या मायेला “आईचं काळीज’ म्हणतात, अगदी तसं शरीरासाठी शक्तिदाता ठरणारे काळीज म्हणजे यकृत (लिव्हर) होय. मानवी शरीराच्या अवघे दोन टक्के वजन असणारे, शरीरात उजव्या बाजूला त्याचे स्थान असलेला हा अतुलनीय अवयव. एखाद्या “पिरॅमिड’सारखा आकार असलेल्या या “जिगरी दोस्त’ची काळजी “आई’प्रमाणेच घ्यायला हवी, कारण “यकृताचे उत्तम आरोग्य ही स्वास्थ्याची गुरुकिल्ली’ आहे.
मानवाच्या शरीरात लिव्हर हा महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याची अनेक कार्य आहेत. शरीराला प्रत्येक गोष्टीसाठी शक्ती देण्यापासून ते रक्ताचे शुद्धीकरण, रक्तात असलेले विष पित्तावाटे बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे कार्य यकृत करते. रक्तात ऊर्जा पुरवणे, इतर काही ऍल्ब्युमिन, तसेच रक्त गोठवणाऱ्या पदार्थांची निर्मितीही यकृत करत असते. लिव्हर सिऱ्हॉसिसच्या आजारात लिव्हरमधील पेशी मारल्या जातात. त्या पेशींचा गुच्छा आणि त्यांची जागी “स्कार टिशू’ तयार होते. आजारामुळे कालांतराने यकृतातील पेशींची संख्या कमी होते. त्या पेशींच्या जागी आलेल्या फायबर्स टिश्यूंमुळे (मेल्याल्या पेशी) यकृतामध्ये साधारण सुरू असलेला रक्तप्रवाह खंडित होतो; त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. रक्तप्रवाह चांगला नसल्याने शरीरावर इतर दुष्परिणाम होतात.
“लिव्हर सिऱ्हॉसिस’ हे शब्द घाबरवून टाकणारे आहेतच, पण ते बुचकळ्यात पाडणारेही आहेत. एखाद्याला “लिव्हर सिरॉसिस’ झाला म्हणजे यकृताशी संबंधित काही तरी असणार, यापलीकडे आपल्याला फारसे काही माहीत नसते. हा आजार नेमका आहे तरी काय, तो कसा होतो आणि तो टाळता येऊ शकेल का, याबद्दल आपण या लेखातून समजून घेऊ.
“लिव्हर सिऱ्हॉसिस’ म्हणजे काय?
यकृत प्रमाणाबाहेर खराब होऊन त्यात गाठी होणे यालाच वैद्यकीय भाषेत “लिव्हर सिऱ्हॉसिस’ असे म्हणतात.
आपल्या आपण नवीन पेशी तयार करून पुन्हा वाढू शकणारा यकृत हा शरीरातील एकमेव अवयव; पण जेव्हा ही प्रक्रिया यकृताला वारंवार करावी लागते, तेव्हा कधी तरी पेशींची फेरनिर्मिती करण्याची त्याची क्षमता संपते. त्यानंतर यकृताच्या पेशी मृत होत राहिल्या तर अशा पेशींच्या गाठी बनतात. यकृतात जिथे-जिथे असे घडते, तो भाग अशा रीतीने खराब होत जातो. यकृत प्रमाणाबाहेर खराब होऊन त्यात गाठी होणे यालाच वैद्यकीय भाषेत “लिव्हर सिऱ्हॉसिस’ असे म्हणतात.
यकृत कशामुळे खराब होते?
यकृत खराब होऊन “लिव्हर सिऱ्हॉसिस’ होण्याची अनेक कारणे आहेत. लिव्हर सिऱ्हॉसिसच्या 30 टक्के रुग्णांमध्ये दारूचे अतिसेवन हे कारण असते. 30 टक्के लोकांमध्ये हिपॅटायटीस “बी’, हिपॅटायटीस “सी’, विषाणुजन्य कावीळ किंवा काही विशिष्ट औषधांमुळे ही प्रक्रिया घडते. पॅरॅसिटॅमॉल किंवा काही पेनकिलर्स आणि इतरही काही औषधांचे अतिसेवन केल्यामुळे यकृत खराब होऊ शकते. उर्वरित रुग्णांमध्ये मात्र त्याची निश्चित कारणे सांगता येत नाहीत. तरीही मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, थायरॉइडचा त्रास आणि स्थूलता असलेल्या व्यक्तींमध्ये “फॅटी लिव्हर’ची समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येवर वेळीच उपचार केले गेले नाहीत, तर त्याचे पर्यावसान “लिव्हर सिऱ्हॉसिस’मध्ये होऊ शकते.
लक्षणे कोणती?
रोजच्या जीवनासाठी आपले शरीर यकृताच्या केवळ 30 टक्के क्षमतेचाच वापर करते. उर्वरित 70 टक्के क्षमता नेहमी अतिरिक्त असते आणि अडीनडीच्या वेळी शरीर ती वापरते. त्यामुळे यकृत जेव्हा 60-70 टक्के खराब होते तेव्हाच त्याची पहिली लक्षणे दिसू लागतात. अशक्तपणा व थकवा हे यकृत खराब होण्याचे पहिले लक्षण असू शकते. दारूचे व्यसन असणाऱ्यांमध्येही ताजेतवाने न वाटणे, कामात लक्ष न लागणे, रात्री झोप न येणे या तक्रारी प्रामुख्याने दिसतात. यावर उपाय म्हणून अनेकदा ही मंडळी दारू सेवनाचे प्रमाण वाढवतात; पण त्यामुळे यकृताची स्थिती बिघडत जाते. त्यानंतर पायावर सूज येणे, पोट फुगणे, पोटात पाणी होणे, वजन कमी होणे, आणखी पुढच्या टप्प्यात स्नायू सैल पडणे, त्वचा कोरडी व काळसर पडणे, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात. रक्ताच्या उलट्या होणे, मूत्रपिंडावर ताण येणे, फुप्फुसात पाणी होणे, मेंदूच्या गोंधळलेल्या अवस्थेपासून “कोमा’पर्यंतही लिव्हर सिऱ्हॉसिसच्या रुग्णांची लक्षणे जाऊ शकतात.
यकृत खराब झाल्यावर..
यकृत खराब होण्याच्या तीन पातळ्या मानल्या जातात. रुग्ण यापैकी कोणत्या अवस्थेत आहे, त्यावरून त्याच्यासाठीचे उपचार ठरवले जातात. लिव्हर सिऱ्हॉसिसच्या अगदी पहिल्या पातळीत यकृत खराब होऊ लागलेले असते; पण पायावर सूज येणे किंवा पोटात पाणी होण्यासारखी लक्षणे या रुग्णांना नसतात. या अवस्थेत औषधोपचारांनी यकृत आणखी खराब होण्यापासून थांबवता येते. इथे एक लक्षात घ्यायला हवे, की सिऱ्हॉसिस झाल्यानंतर ते पूर्णत: बरे होत नाही; पण औषधांनी त्यावर नियंत्रण मिळवता येते. त्याच्या पुढच्या टप्प्यातल्याही काही निवडक रुग्णांना औषधोपचारांनी फायदा होतो; पण दुसऱ्या आणि तिसऱ्या पातळीवर असलेल्या आणि यकृत खूपच खराब झालेल्या रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय दिला जातो. यकृत प्रत्यारोपण झालेल्यांपैकी जवळपास 90 टक्के रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात.
प्रतिबंध कसा करावा?
आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणे हाच लिव्हर सिऱ्हॉसिस होऊ नये यासाठीचा उत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. ज्यांना दारू पिण्याची सवय आहे, त्यांनी कुठे थांबावे याचा वेळीच विचार करणे गरजेचे आहे. मद्यपी व्यक्तींमध्ये वेळोवेळी यकृतासाठीच्या तपासण्या आवश्यक आहेत. लिव्हर सिऱ्हॉसिसच्या दिशेने प्रवास सुरू आहे असे लक्षात आले तर त्यांना यकृत आणखी खराब होणे टाळण्यासाठी दारूचे सेवन थांबवून जीवनशैलीत सकारात्मक बदल करावे लागतात. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदललेल्या जीवनशैलीत चाळीस वर्षांवरील व्यक्तींनी पन्नास वर्षांचे होईपर्यंत प्रत्येक तीन वर्षांनी प्रतिबंधक तपासणी करणे, तर पन्नास वर्षांनंतर प्रतिवर्षी तपासणी करून घेणे चांगले. यात काही रक्तचाचण्या व यकृताच्या अल्ट्रासाऊंड चाचणीचा समावेश होतो.
हिपेटायटिस “बी’ व “सी’ झालेला असल्यास त्यावर वैद्यकीय सल्ल्याद्वारे नियंत्रण ठेवता येते. लिव्हर खराब करू शकतील अशी औषधे वैद्यकीय सल्ल्याने घेतलेली बरी. लिव्हर सिऱ्हॉसिस होणे अथवा यकृत खराब होण्याची अनेक कारणे आहेत. आपण खबरदारीचा उपाय करू शकतो. हिपॅटायटिस बी होऊ नये यासाठी हिपॅटायटीस बीचे लसीकरण करून घेणे. दारू पूर्णता पिणे बंद करा, हिपॅटायटिस सी वर प्रतिबंधक औषधे आहेत. तीन महिन्यांची औषधे घेतल्याने आजार बरा होतो. फॅटी लिव्हर होऊ द्यायचे नसेल, तर व्यायाम करावा. फास्ट फूड खाऊ नये. त्यामुळे स्वतःला आजारापासून मुक्त करू शकता. आजाराचे निदान त्वरित करून उपचार करणे गरजेचे असते. त्यामुळे आजाराची वाढ रोखण्यास मदत होते. यकृत पूर्णपणे पूर्वीच्या स्थितीत येत नाही. सिरॉसिस झाल्यास त्यावर कायमस्वरूपी लक्ष द्यावे लागते. परिणामी भविष्यात लिव्हर कॅन्सर होण्याची भीती अधिक असते. त्याकरिता त्याबाबत लक्ष देण्याची गरज असते.
(शब्दांकन : विशाल पाटील)