व्हिडिओ

सह्याद्री हॉस्पिटल्स तर्फे पुण्यातील 38वर्षीय रूग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण
सोलापूर ते पुणे दरम्यान ग्रीन कॉरिडॉरमुळे दोन तास 50 मिनिटांत प्रवास शक्य
पुणे,25 जुलै 2018 : सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नगर रोड तर्फे लिव्हर सिरॉसिसने ग्रस्त असलेल्या पुण्यातील 38 वर्षीय रूग्णावर यशस्वीरित्या यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. सोलापूर येथील एका 53 वर्षीय रूग्णाला डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर आश्‍विनी सहकारी रूग्णालयात मेंदूमृत घोषित करण्यात आले. या रूग्णाने यकृत व मुत्रपिंड दान केल्याने तीन व्यक्तींना जीवदान मिळाले आहे. मुत्रपिंड अन्य रूग्णालयास देण्यात आले,तर यकृत सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नगर रोड येथे आणण्यात आले.

याप्रसंगी बोलताना सह्याद्री हॉस्पिटल्सचे हेपॅटोबिलियरी व यकृत प्रत्यारोपण तज्ञ डॉ.दिनेश झिरपे म्हणाले की,सोलापूर येथील 53 वर्षीय व मेंदूमृत घोषित केलेल्या रूग्णाविषयी आम्हाला माहिती मिळाली.त्यानंतर ताबडतोब आमची टीम सोलापूरला पोहोचली व त्यांनी हे यकृत पुण्यात आणले.सर्वसामान्यपणे सोलापूर ते पुणे प्रवासासाठी 5 तास लागतात.मात्र ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून हे यकृत 2 तास 50 मिनिटे इतक्या कमी वेळात पुण्यात आणण्यात आले.
हेपॅटोबिलियरी व यकृत प्रत्यारोपण तज्ञ डॉ.बिपीन विभुते म्हणाले, आमची टीम दुपारी 12 वाजता निघाली व पुण्यात 2 वाजून 50 मिनिटांनी पोहोचली.त्यानंतर पुण्यातील रूग्णावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.या रूग्ण शेवटच्या टपप्प्यातील लिव्हर सिरॉसिसने ग्रस्त होता.
यकृत प्रत्यारोपण व हेपॅटॉबिलिअरी सर्जन डॉ.बिपीन विभूते, डॉ दिनेश झिरपे,डॉ अनिरुद्ध भोसले,भूलतज्ञ डॉ मनीष पाठक,डॉ मनोज राऊत , क्लीनिशिअन डॉ अभिजीत माने,प्रत्यारोपण समन्वयक राहुल तांबे व अरुण अशोकन,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता नितीन दुषिंग यांनी या प्रत्यारोपणामध्ये महत्वाची भूमिका बजावली .
सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स चे युनिट प्रमुख डॉ.केतन आपटे म्हणाले कि, अवयवाच्या प्रत्यारोपणाबाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी आनंददायी बाब आहे. परंतु, अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयदाते यांच्या संख्येत अजुनही प्रचंड तफावत आहे. ही दरी भरून काढायची असेल तर अवयवदान किमान 20 पटीने वाढणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प करणे आवश्यक आहे. रूग्णाच्या नातेवाईकांनी यकृत दान करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. तसेच, मेडिकल सोशल वर्कर,वाहतूक पोलीस,आमच्या डॉक्टरांच्या टीममधील भुलतज्ञ व कर्मचार्‍यांचा समावेश असलेले आमचे सर्व पथक यांच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.